क्षारयुक्त जमिनीची सुधारणा


क्षारयुक्त जमिनीची सुधारणा 
✓ जमिनीला 1 टक्के उतार द्यावा.
✓ शेतात जमिनीच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चर खोदणे.
✓ शेतीला पुरेसे पाणी देवून विद्राव्य क्षारांचा निचरा करून चराद्वारे शेताबाहेर काढावे.
✓ पिकांच्या फेरपालटीत हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
क्षारसहनशिल पिके घ्यावीत.
✓ ओलिताखालील शेत पडीक ठेवू नये, जमीन नेहमी पिकाखाली ठेवावी अन्यथा शेत जमीन अधिक क्षारयुक्त होईल.
✓ जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा.
चोपण जमीन : 
गुणधर्म : जमिनीचे विनिमय युक्त सोडीयमचे प्रमाण शेकडा 15 पेक्षा जास्त असते.
विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता 4 डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा कमी असते व सामू 8.5 ते 10 पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते, ओल्यापणी अतिशय चीबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही.
सुधारणा :
जमिनीला 1 टक्के उतार द्यावा.
✓ जमिनीखाली सच्छिद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा.
✓ जमीन सपाट करून योग्य अंतरावर चर काढावेत.
माती परीक्षण करून जिप्सम यासारख्या भूसुधारकाचा वापर करावा. जमिनीमध्ये गरजेनुसार सर्वसाधारणपणे 5 ते 10 टन हेक्टरी जिप्सम शेणखतात मिसळून टाकावे.
✓ क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत शुगरबीट, बार्ली,  बरसीम, भात, गहू, ऊस, कापूस यासारखी क्षारसहनशिल पिके घ्यावीत.
✓ सेंद्रीय खतांचा वापर वाढवावा.
✓ पिकांच्या फेरपालट करताना धेंच्या हे हिरवळीचे पीक द्यावे.
✓ माती परीक्षण करून नत्रयुक्त खते शिफारशीपेक्षा 25 टक्के वाढवून घ्यावीत.
✓ माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
चुनखडीयुक्त जमीन :
गुणधर्म :
✓ सामू 8 पेक्षा जास्त व घडण कठीण बनते.
✓ जमिनीची विद्युत वाहकता 1 डेसी सायमन प्रती मीटर पेक्षा कमी असते.
✓ भौतिक गुणधर्मात घनता वाढते व जलधारणशक्ती कमी होते.
✓ हवा पाणी खेळण्याचे प्रमाण व्यस्त राहते.
✓ नत्र, स्पुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते.
✓ वाळवी, हुमनी किडींचा उपद्रव वाढतो.
✓ पिकांची वाढ खुंटते.
सुधारणा :
✓ खोलवर नांगरट करावी.
✓ सेंद्रिय / हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा.
✓ माती परीक्षणानुसार जमिनीमध्ये अथवा फवारणीद्वारे रासायनिक व चीलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.
✓ चुनखडीयक्त जमिनीत गंधक 1 टन किंवा आयरन पायराईट 2 टन ही भुसुधारके वापरावीत. भुसुधरके दिल्यानंतर भरपूर पाणी द्यावे त्यामुळे जमिनीतील क्षार वाहून जाण्यास मदत होते. जमिनीतील सोडियमचे प्रमाणही कमी होऊन जमिनीची जडणघडण सुधारते.
✓ सहनशील पिकांची निवड करावी. सीताफळ, बोर, आवळा, अंजीर, सूर्यफूल, सोयाबीन, गहू, कापूस, ऊस इत्यादी.
क्षारपड जमीन सुधारणेसाठी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली जेसीबी मशीनच्या साहाय्याने 90 सेमी ते 1.80 मीटर खोलीचे चर काढावेत. कलेक्टर ड्रेन 600 मीटर लांबीची टाकून त्याला 0.3 टक्के उतार ठेवावा आणि लॅटरल ड्रेन साठी 0.2 टक्के उतार ठेवावा. दोन लॅटरल मधील अंतर 25 मीटर ठेवून प्रत्येक 75 मीटरची लॅटरल कलेक्टर ड्रेनला  काटकोनात जोडाव्या. एकूण 30 लॅटरल आणि 2 कलेक्टर ड्रेन काडल्यास, त्यासाठी बिगर छिद्राची कोरूगेटेड पिव्हिसी 80 मिमी पाईप वापरावा आणि त्याला 0.3 टक्के उतार ठेवावा. त्यालाप प्रत्येक 25 मीटरवर काटकोनात 75 मीटर सच्छिद्र कोरूगेटेड पिव्हिसी 80 मिमी पाईप टीच्या साहाय्याने जोडावी. पाईपच्या खाली दोन इंचाचा बारीक वाळूचा थर द्यावा. त्यावर पाइप अंथरावा.नंतर लोखंडी फ्रेम वापरून त्यावर एक फूट रुंद, एक फूट उंचीचा जाड वाळूचा थर द्यावा. नंतर त्यावर 2 इंच जाडीचा बारीक वाळूचा थर देवून पाईपचे एक टोक कलेक्टर द्रेनला जोडावे. आणि दुसऱ्या टोकाला एन्ड कॅप बसवून मातीने बुजवून घ्यावी. प्रत्येक चार लॅटरल नंतर 1 पडताळणी चेंबर कलेक्टर ड्रेनवर बसवावा. यासाठी साडेतीन फूट व्यासाची आणि आठ फूट उंचीची सिमेंट पाईपाचा वापर करावा.सर्व पाणी एका इन्स्पेक्शन चेंबर मध्ये घेवून शेवटी चार मीटर व्यास आणि 5 मीटर खोलीच्या सबवेल मध्ये गोळा करावे, सबवेलमधील पाणी पंपाच्या साहाय्याने उचलून नैसर्गिक मोठ्या चरात सोडावे. याचा एकरी अंदाचे खर्च 25000 इतका येतो
निचरा प्रणालीचे फायदे :
✓ पिकांच्या वाढीसाठी योग्य असे वातावरण जमिनीत तयार होते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते.
✓ पिकांच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन पीक जोमदार वाढते.
✓ या पद्धतीने जमिनीची संरचना सुधारून पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.
✓ प्रमाणशीर मशागत करण्यास सोईस्कर जाते.
✓ जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते.
✓ जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमीन लागवडीस योग्य होते.
✓ वापसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बिजांकुरण वाढण्यास मदत होते.
भुसुधारकांचा वापर : चोपण जमीन सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक, फेरस सल्फेट, आयरन पायराईट, फॉस्पोजिप्सम, यासारख्या रासायनिक भुसुधारकांचा उपयोग करता येतो.
जिप्सम : माती परीक्षण करून जिप्समची गरज ठरवल्यानंतर आवश्यकतेचा अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग जिप्सम दोन वर्षानंतर शेणखतात मिसळून वापरावा. जिप्सममध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त सोडियम ऑक्साईडचे प्रमाण असू नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या 20 सेमी थरात चांगली मिसळून घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपूर पाणी मिसळून
जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. जिप्सममधील कॅल्शिअमची मातीच्या चिकट कणांना चिकटलेल्या सोडियमशी प्रक्रिया होऊन सल्फेट तयार होते. सोडियम सल्फेट विद्राव्य असल्याने त्याचा जमिनीतून निचरा होऊन जनिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो आणि जमिनीची भौतिक जडणघडण सुधारते.
आयरन पायराईट : पायराईट्सचा वापर चोपण जमीन सुधारण्यासाठी होतो. त्यामध्ये गंधक आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. पायराईट्समध्ये असलेल्या गंधकावर पाण्याची व हवेतील ऑकसिजनची तीव्र प्रक्रिया होऊन गंधक आम्ल तयार होते त्यामुळे जमिनीत सुधारणा होते. यासाठी अमझोरी पायराईट्सचा वापर प्रभावशाली असल्याचे सिध्द झाले आहे. आमझोरी पायराईट्स जमिनीमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये असलेल्या गंधकावर पाण्याची व हवेतील ऑकसिजनची तीव्र प्रक्रिया होऊन गंधक आम्ल आणि लोहाचे सल्फेट तयार होते. याबरोबरच थायोबॅसिलस या जैविकाचा व सेंद्रिय खताचा वापर केल्यास ही क्रिया जलद होण्यास मदत होते. लोहाची सल्फेटवर पुन्हा प्रक्रिया होऊन त्यापासून गंधक आम्ल तयार होते. पायराईट्स + पाणी + ऑक्सिजन = लोहाचे सल्फेट + गंधक आम्ल, लोहाचे पाणी + पाणी = लोहाचे हाइड्रॉक्साइड + गंधक आम्ल अशा रीतीने तयार झालेले गंधक आम्ल जमिनीतील चुनखडीचवर प्रक्रिया करते व त्याचे कॅल्शियम संगेत बनवते. चुनखडी + गंधक आम्ल = जिप्सम + पाणी + कार्बनडायऑक्साइड , सदर कॅल्शियम सल्फेट मधील कॅल्शिअमचे जामिनितील सोडियमशी विनिमय होऊन सोडियम सल्फेट तयार होते. ते पाण्यात विरघळणारे असल्याने पाण्याबरोबर त्याचा निचरा होऊन जमिनीतील सोडियमचे प्रमाण कमी होते. साधारणतः 2 ते 4 टन प्रति हेक्टरी पायराईट्सची मात्रा चोपण जमीन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. पायराईट्सचा वापर करण्यापूर्वी जमिनीस हलके पाणी देऊन पायराईट जमिनीवर एकसारखे मिसळून टाकावे.
  जमिनीचे व्यवस्थापन :
1. जमिनीचे सपाटीकरण :
उंच सखल किंवा अति चढ उताराच्या जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. शेतात उंचवट्यावर पाणी पोहचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहचते व सखल भागात ते वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात साठते. वाजवीपेक्षा जास्त उतार असेल तर वाफ्यात किंवा साऱ्यात दिलेले पाणी उताराच्या दिशेने निघून जाते व साऱ्यांना किंवा वाफ्यांना पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होते.क्षार असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त आहे त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पावसाचे पाणी सुध्धा उताराच्या दिशेने चारित सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे भारी जमिनीत 0.05 ते 0.25 %, मध्यम जमिनीत 0.20 ते 0.40% व हलक्या रेताड जमिनीत 0.25 ते 0.35% उतार समाधानकारक असतो.
2. पाणी नियोजन : ‌जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये याकरिता अतिरिक्त पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ठिबक सिंचनासारखे प्रभावी तंत्रज्ञान वापरले पाहिजे. ठिबक सिंचनातून भूगर्भातील खारवट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरित्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रमाण, विद्राव्य क्षार 2000 मीलिग्रम/ लिटर किंवा 3.12 डेसिसायमन/ मीटर पर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते, या संचामुळे होणारे ओळीत क्षेत्र एकमेकांवर 20 % झाकले जने आवश्यक आहे. यात तोटिजवळ सतत ओलावा टिकून राहतो. त्यामुळे खारवट पाण्यातील क्षारांची तीव्रता कमी होते. त्याकरिता तोटिजवळ पिकाची लागवड करणे फायद्याची ठरते.
3. जमिनीची मशागत : जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते व पृष्भागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. चोपण किंवा भारी काळया जमिनीत सबसॉयलरसारखे औजाराच्या साहाय्याने खोलवर नग्रणी करता येते.
4. पिकाची फेरपालट : जमिनीची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने एकच पीक वारंवार न घेता फेरपालट करणे आवश्यक असते. नेहमी आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके शिवाय ताग, शेवरी यासारखी हिरवळीची खते घेतल्यास समस्या कमी होऊ शकते. तसेच जमिनीत सतत पीक घ्यावे. जमीन पडीक राहू नये. ज्यावेळी पीक घेणे शक्य नसेल त्यावेळी बरसीम, लसूण घास, पॅराग्रास, करणाल गवत लावावे. शिवाय क्षार प्रतिकारक्षम पिकांची निवड करणे फायद्याचे ठरते.
5. रासायनिक खते : क्षार व चीबाड जमिनीतून नत्राचा बऱ्याच प्रमाणात ह्रास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा 25 टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय स्पुरद, लोह व जस्ताची कमतरता सुध्दा जाणवते. त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते.
6. कंपोस्ट कल्चरचा वापर : क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गाचा एकत्रितपणे अवलंब करावा लागतो. कंपोस्ट कल्चरचा वापर करून शेतातील पाचट, गव्हाचे काड, भाताचे पिंजर, काडीकचरा वगैरे टाकाऊ सेंद्रिय पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करावे. या खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्यामुळे  माती कणांची संरचना बदलते आणि हवा + पाणी यांचे प्रमाण प्रमाणशीर होते.
7. माती परीक्षण :
खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत त्याची तपासणी करावी व नंतर सुधारणेचे उपाय करावेत. खतांची मात्रा सुध्दा माती परीक्षण करुन द्यावीत.
जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी :
✓ जमिनी सपाट असाव्यात व बांधबंदिस्ती करावी.
✓ जमिनीमध्ये पाणी साठवून राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
✓ जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत.
✓ जमिनीतून पाण्याची पातळी 2 मीटरच्या खाली ठेवावी.
पिकांच्या वाढीसाठी जरुरीप्रमाणेच पाणी द्यावे. विशेषतः ऊस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
✓ आपल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपू देऊ नये.
✓ जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ व हिरवळीचे खते वापरून मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती राहते व ज्यादा पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते.
✓ विहिरीचे पाणी जास्त खारवट असल्यास नियमित जमिनीस वापरू नये.
✓ माती व पाणी नेहमी तपासून जमिनीचे भौतिक आणि रासायनिक बदल याबद्दल मृदाशास्त्राज्ञांकडून माहिती मिळवणे.
✓ सूक्ष्म जलसिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा
क्षार व चोपण जमिनीसाठी खालील प्रमाणे पिकांची संवेदनशीलतेनुसार निवड करावी.
Crop sensitive to problematic soil
क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशीलता

Comments

Popular posts from this blog

ऊस लागवड

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार